Life of Stories

# 1548: एकाकीपणा विकत घेणे आहे. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

August 20, 2024 डॅा. सौ. आरती जुवेकर.

एकदा मी असेच काम मिळेना म्हणून हताश होऊन बागेत बसलो होतो तेथे एक आजी येवून बसल्या. सुरुवातीला मला राग आला. त्यांनी माझी चौकशी केली. मी फक्त हो/ नाही करत राहिलो. त्याच त्यांचे काहीबाही सांगत होत्या. बराच वेळ झाला मग त्या म्हणाल्या "माझा नातू तुझ्या एवढाच आहे. तुला बघून तोच आठवला म्हणून बोलले एवढे. तो परदेशी असतो. पती वारले आहेत. घरी मी एकटीच दिवसभर कोणाशी बोलणार कामाच्या बायका व्यतिरिक्त कोणी येत नाही. कोणाशी बोलू ? मग इथे बागेत येते. कोणाशी तरी बोलत राहते. ऐकून घेणारे कोणीतरी भेटते. बोलले की जीव हलका होतो. नाहीतर खाण्याखेरीज तोंड उघडत नाही दिवसभर. बर निघते मी, ये उद्या बोलायला असाच."
त्या आजीशी मी फार बोललो नाही. त्याच खूप काही बोलल्या, त्यांना बरे वाटले आणि मला माझे काम सापडले तिथेच..!!