Life of Stories

# 1595: आई आणि आईपण. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

डॅा. सौ. आरती जुवेकर.

Send us a text

बाळ जन्माला येतं आई सुटकेचा नि:श्वास सोडते. त्या जीवाच्या जन्मवेणा मात्र अजून संपलेल्या नसतात. नऊ महिने आईच्या गर्भातल्या पाण्यात, काळ्यामिट अंधारात तरंगणारा, आईच्या रक्तामासावर पोसलेला तो जीव त्या पाण्याबाहेर पडतो. पाण्यातून थेट हवेत.
 काळ्यामिट अंधारातून भगभगीत उजेडात. आईच्या हृदयाची धडधड आणि गर्भाशयाची भिंत पार करून त्याच्या पर्यंत पोहोचणारा तिचा हलकासा आवाज इतकीच काय ती त्याची आवाजाशी ओळख. 
आणि जन्माला येताक्षणी इतके सारे आवाज त्याच्या कानावर आदळतात. किती ताण येत असेल या सर्वस्वी वेगळ्या वातावरणाचा त्याच्या इवल्या-इवल्या नाजूक कोमल डोळ्यावर, कानावर आणि हृदयावर! त्याच्यासाठी किती अवघड असेल या अवकाशाला सामोरं जाणं! 
आईची नाळ तुटल्यावर पहिला श्वास घेणं! दाणकन कुठल्या तरी दुसऱ्याच विश्वात आदळतं ते. आणि मग कळवळून ते अगदी बेंबीच्या देठापासून ट्याहा करतं.